जळगाव प्रतिनिधी । अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास मागास महामंडळांतर्गत असलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या सुचना अधिकारी व बँक प्रतिनिधी यांना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ज्या समाजाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना या महामंडळातर्फे लाभ दिला जात आहे. मराठा आणि कुणबी पाटील हे दोन्ही भाऊ भाऊ आहे. कुणबी समाजातील बांधवांना या सेवेचा लाभ मिळत नाही ही बाब राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून हा लाभ कुणबी पाटील यांना देखील मिळावा, अशी विनंती करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास मागास महामंडळांतर्गत असलेल्या योजनांची कामे ही ऑनलाईन असल्यामुळे यातील कामांना गती मिळणार आहे. तसेच ही प्रक्रिया 100 टक्के ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे बोगस प्रकरणे आणि भ्रष्टाचार होणार नाही. दरम्यान मराठा समाजातील तरूण जे उद्योग व रोजगारासाठी कर्ज घेण्याची इच्छा आहे मात्र कागदपत्रांबाबत बँकेकडून कोणतीही माहिती व्यवस्थीत देत नाही तसेच कागदपत्रांमध्ये कोणत्या त्रुट्या आहेत हे देखील सांगितले जात नाही. त्यामुळे अशा तरूणांनी हिसमुड होवू नये यासाठी बँकांनी संपुर्ण कागदपत्रे तपासल्यानंतरचा प्रस्ताव पाठवावा, असे देखील महामंडळाचे अध्यक्ष श्री.पाटील यांनी सांगितले.
काय आहे ही योजना
अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास मागास महामंडळामार्फेत महराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग यांच्या अन्वये छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान ही सुधारित योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील आर्थीकदृष्या मागास घटकातील उद्योजक बनु इच्छिणाऱ्या तरूणांना आर्थीक सहाय्य देण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून 10 ते 50 लाख तर गट प्रकल्प कर्ज योजना अन्वये 10 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे.
178 जणांना 10 कोटी 25 लाखांचे कर्ज वाटप
जिल्ह्यातील 1322 उमेदवारांनी या योजनेची माहिती घेतली असून एकूण 545 उमेदवारांना वैयक्तिक कर्ज परतावा योजनेसाठी अर्ज केला होता. त्यातील एकूण 178 उमेदवारांना बँकेद्वारे विविध व्यवसायांकरिता 10 कोटी 25 लाख 77 हजार 326 रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यासाठी 97 लाभार्थ्यांना महामंडळाचा व्याज परतावा रक्कम 41 लाख 61 हजार 473 रूपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
या बँकांकडून प्रकरणे मंजूर (कंसात मंजूर केलेले प्रकरणे)
जळगाव जनता बँक (40), चिखली अर्बन को-ऑप बँक (14), एसबीआय (4), महाराष्ट्र ग्रामीण बँक (2), कोटक महिंद्रा (88), आयडीबीआय (3), आयसीआयसीआय (1), यश बँक (3), युनियन बँक ऑफ इंडिया (1), बँक ऑफ बडोदा (1), अक्सीस बँक (14), एडीएफसी बँक (5), डीसीबी बँक (1), आणि बँक ऑफ महाराष्ट्र (1) यांनी कर्जाची प्रकरणे मंजूर केली आहे.