मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे -खेवलकर यांच्या संकल्पनेतून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” या अभियानास मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निंबोल तालुका रावेर या गावापासून शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टिकर घराघरात दर्शनी भागावर चिकटविण्यात येणार आहे. या स्टिकर वर “आम्ही सदैव साहेबां सोबत” लढा विचारांचा जनतेच्या हिताचा असा उल्लेख करण्यात आला असुन खा.शरद पवार व आ. एकनाथराव खडसे, ॲड.रविंद्र पाटील, ॲड रोहिणी खडसे यांचे फोटो आहेत. रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतील राष्ट्रवादी काँग्रेसची मतदार संघात काढलेली जनसंवाद यात्रा ही अत्यंत यशस्वी झाल्याने राज्यात चर्चेचा विषय झाली होती. त्या जनसंवाद यात्रेनंतर आता “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” हे अभियान सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रमाचाच एक भाग आहे.
या अभियानातुन अतिशय आकर्षक स्टिकरच्या माध्यमातून गावागावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पोचवली जाणार आहेत. आज रावेर तालुक्यातील निंबोल येथे मोहन काशिनाथ पाटील यांच्या घरावर या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचे स्टिकर चिकटवून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की,” मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा.शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे विचार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानांतर्गत कुटुंबांपर्यंत पोहोचून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” ही संकल्पना नागरिकांच्या मनामनात रुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शरद पवारसाहेबांचे कार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे.छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू असून साहेबांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, आर्थिक, कृषी, सहकार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, इत्यादि क्षेत्रातील कार्य उत्तुंग आहे. त्यांचें कार्य आपल्याला जनसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी आता सज्ज व्हायचे आहे.कितीही कठिण प्रसंग आले तरी महाराष्ट्रातील जनता सदैव शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. आपल्याला आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबुत संघटन निर्माण करायचे असून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे नागरिक पदाधिकारी यांनी आमचे घर राष्ट्रवादीचे घर अभियानात मोठया संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष, पं स सदस्य दिपक पाटील, मोहन पाटील ,हिरालाल पाटील ,गोकुळ पाटील ,सुनिल पाटील, निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, जितेंद्र (भैय्या) पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.