यावल प्रतिनिधी । येथील आदिवासीच्या विविध मागण्यासाठी आदिवासींच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.26 जुलै रोजी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देऊन दुपारी 1:30 वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला.
येथील बोरावल गेट परिसरातील धनश्री चित्र मंदिराच्या आवारात रावेर, चोपडा व यावल तालुक्यातून व इतर ठिकाणाहून शेकडो जमलेल्या आदीवासी बांधवांना नेत्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन पर माहिती देतांना सांगितले की, आपल्या जिल्हा किवा राज्यच नव्हे तर संपुर्ण देशात आदीवासी बांधवांसाठी लढा देणाऱ्या विविध आदीवासी संघटना कार्य करीत असुन, मागील २० वर्षापासुन नैसर्गिक संसाधनांवर स्थानिकांचा अधिकार हा स्व-शासनाचा लढत असल्याचे जाणवत आहे. लोक संघर्ष मोर्चा देखील त्याचाच एक भाग असुन वनह्क्क कायद्याच्या जनपक्षीय अंमलबजावणी, पैसा आणि नवसंजीवनी भागातील शिक्षण, आरोग्य व रोजगारसारख्या प्रश्नासाठी आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बोरावल गेट पासुन शहरातील प्रमुख मार्गाने आदीवासी बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे, केंद्र सरकारने अन्यायकार तयार केलेला वन कायद्याचा मसुदा त्वरीत मागे घ्या व जनपक्षीय वनकायदा करावा, तालुक्यातील आदिवासीचे मंजुर झालेले पट्टे असो की अपील अशा प्रलंबीत दावेदारांना तात्काळ दुष्काळी अनुदान द्यावे, प्रलंबित दाव्यांची तात्काळ चौकशी व १२ अ ची प्रक्रिया करावी, अभयारण्याला धोका ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्यासाठी ग्रामसभा घ्यावी, आदीवासीच्या ताब्यातील जमीनचे पट्टे मंजुर झालेल्या दावेदारांची टेबलमोजणी करुन सातबारा देण्यात यावा, सर्व गावांना सामुहिक वन अधिकार देण्यात यावे, मंजुर गावांना सुष्मनियोजन आराखडा करण्यात यावा, जामन्या येथील नादुरूस्त पाझर तलाव तात्काळ दुरूस्त करा, सर्वाना स्वस्त धान्य व रोजगार द्यावे, तालुक्यातील पैसा निधीची गावनिहाय माहीती द्यावी व जामन्या गाडऱ्या येथील उपकेंद्रावर पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी द्यावा अशा प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार जितेन्द्र कुवर व आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना देण्यात आले आहे.
यात आदीवासी महिलांनी मोठया संख्येत सहभाग नोंदवला होता. तसेच विविध मागण्याच्या घोषणा देत येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना प्रतिभा शिंदे यांच्यासह मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, सचिन धांडे, भरत बारेला, प्रताप बारेला, पांडु बारेला, हैदर तडवी, पन्नालाल मावळे, अहमद तडवी, मनसुर मिरखॉं तडवी, संजय पारधी, हिरा पाटील, धर्मा बारेला, राजाराम पुढाई, खेत्या पाटील यांच्यासह आदी बांधवांनी आपल्या स्वाक्षरी केलेल्या निवेदन दिले आहे. तसेच यावेळी वनजीवनचे सहाय्यक वनसंरक्षक रतनलाल भवर, पश्चिम वन विभागाचे विशाल कुटे, सहाय्यक वनसंरक्षक मधुकर नेमाडे, शिक्षण विस्तार अधिकारी एजाज शेख, प्रा.ग.वि.अ.किशोर सपकाळे, कृषी विभागाचे अधिकारी आदी प्रामुख्याची उपस्थिती होती. यावेळी मोर्चकरांच्या मागणीला सकारात्मक उत्तर तहसीलदार जितेंद्र कुवर व प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिले आहे.