अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पावर आधारित बोहरा येथील साने गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजनेच्या प्रायोगिक तत्वावर पुर्नस्थापना व दुरुस्तीच्या ११.४९ कोटी रुपये किमंतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता आज (दि.११) मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, सदर उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आ. स्मिता वाघ यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे. निम्न तापी प्रकल्पावर आधारित साने गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे निम्न तापी प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध असतांना देखील परिसरातील शेतकरी वर्गाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे, सहकारी उपसा सिंचन कार्यान्वित करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यानी स्मिता वाघ यांच्याकडे केली होती. स्मिता वाघ यांनी वेळोवेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. गेल्या उन्हाळी विधीमंडळ अधिवेशनात स्मिता वाघ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाच्या ह्या मागणीकडे लक्ष वेधले होते.
गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजना पुन:स्थापित केल्यामुळे निम्न तापी प्रकल्पातील १२.९७ द.ल.घ.मी इतक्या पाणी साठ्यातील पाण्याच्या उपयोग होवून अमळनेर तालुक्यातील १६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार असल्याने नागरिकांनी स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री व जिल्हायचे पालक मंत्री गिरिश महाजन यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.