भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील इंदिरा नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूप घेत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता घडला. यामध्ये तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून, त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
भुसावळ शहरातील इंदिरा नगर परिसरात राहणारा गणेश सुदाम खंडारे (वय २४) हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी रात्री ९ वाजता तो आपल्या घराजवळ उभा असताना संदीप कसट (रा. इंदिरा नगर, भुसावळ) हा परिसरात उभा राहून मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. गणेशने “शिवीगाळ का करत आहे?” असे विचारले असता, संशयित संदीप कसट याने अचानक हातातील धारदार शस्त्राने गणेशच्या मानेला गंभीर जखम केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गणेश रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.
घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार
हा प्रकार घडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गणेश खंडारेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची माहिती दिली. या प्रकरणी संशयित आरोपी संदीप कसट याच्या विरोधात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार तेजस पारीस्कर हे करत आहेत.