पाळधी येथे भरधाव कारच्या धडकेत द्वारकानगरातील तरूणाचा मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । द्वारकानगर येथील लग्नातील हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी पाळधी येथे गेलेल्या तरूणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० घडली. कारचालक कार सोडून पसार झाला आहे. याबाबत पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

 

गणेश सुखदेव महाजन (वय-३०) रा. द्वारका नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश महाजन हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह द्वारका नगर येथे वास्तव्याला आहे. गणेश महाजन हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होतो. जेवण करून कुटुंबासह सर्वजण आनंदाने नाचले. नाचण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार यांच्यासोबत पाळधी येथे हॉटेलात जेवणासाठी गेले.

 

पाळधी येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर गणेश हा त्याच्या मित्रासह आगोदर द्वारकानगर कडे रवाना झाले. हॉटेलपासून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला मित्र जखमी झाला. कारचालक कार सोडून पसार झाला होतो. गणेशचा मागून येणारा मोठा भाऊ किशोर महाजन याने रस्त्यावर कोणीतरी पडलेले दिसल्याने त्याचा मदत म्हणून थांबला. परंतू दुसरे तिसरे कोणी नसून लहान भावाचा अपघात झाल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले.  वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गणेशच्‍या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणेशच्‍या पश्‍चात आई– वडील, पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ वहिनी असा परिवार आहे. पाळधी पोलीसांनी कार जप्त केली आहे.

Protected Content