जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा शिवारात ट्रक्टरने काम करत असतांना बंधाऱ्यावर वळवतांना ट्रक्टर पलटी झाल्याने तरूण ट्रक्टर चालकाचा दबुन मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. मुलाचा ट्रक्टरखाली मृतदेह पाहून आईवडीलांना हंबरडा फोडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कैलास तुकाराम राठोड (वय-२०) रा. रामदेव वाडी, जळगाव हा आयटीआय मध्ये शिक्षण घेणारा तरूण विद्यार्थी आपल्या स्वत:च्या वावडदा शिवारातील शेतात आई मुन्नाबाई, वडील तुकाराम गंगाराम राठोड आणि मोठे काका सिताराम गंगाराम राठोड यांच्यासह आज सकाळी १० वाजता ट्रक्टरने कामावर गेले. यावेळी कैलास राठोड हा शेतात ट्रक्टरने टिलर करण्याचे काम करत होता. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बंधाऱ्यावरून ट्रक्टर वळवित असतांना ट्रक्टर अचानक पलटी झाले. त्यात कैलासच्या पोटावर चाक आल्याने त्याचा दबुन मृत्यू झाला. यावेळी शेतात काम करणारे आई, वडील व काका यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत कैलास ठार झाला होता. मुलाचा दबुन मृत्यू झाल्याचे पाहून आईवडील व काकांनी एकच हंबरडा फोडला. शिवारातील शेतकऱ्यांनी तातडीने ट्रक्टर बाजूला करून मृतदेह काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि विशाल राठोड करीत आहे.