जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवम नगर येथे घरफोडीची घटना समोर आली असून अज्ञात चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम नगर येथे राहणारे स्वप्निल विश्वनाथ गवळी (वय ३२) हे कुटुंबासह वास्तव्याला असून खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. सात फेब्रुवारीच्या सकाळी ७ वाजता घर बंद करून ते बाहेर गेले होते. त्यानंतर आठ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत घर बंद होते. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधत घराच्या कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील दोन्ही लोखंडी कपाट फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गवळी कुटुंब घरी परतल्यावर घरफोडीची घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे रविवारी (९ फेब्रुवारी) दुपारी १२.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत.