मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मित्राचे इतरांसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून टणक वस्तू डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पवन नगरात घडली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राहूल दिलीप तायडे वय ३७ रा. कांचन नगर, जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील पवन नगरातील सात खोल्याजवळ राहूलचा मित्र निखील चौधरी यांचे काहीतरी कारणावरून शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे सर्व रा. जळगाव यांच्या सोबत भांडण सुरू होते. मित्राचे भांडण सुरू असल्याचे पाहून राहूल तायडे हा भांडण सोडविण्यासाठी गेला. या रागातून शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे या तिघांनी शिवीगाळ करत राहूल तायडे याला बेदम मारहाण केली तर एकाने टणक वस्तू डोक्यात टाकल्याने गंभीर जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत बुधवारी १ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.

Protected Content