जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “अभ्यासात हुशार पण मनात खोल झंझावात…” असं वर्णन करता येईल त्या ३५ वर्षीय महेशचे, जो गेली १८ वर्षे स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक आजाराशी झुंजत होता. मात्र, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्रयत्नांनी अखेर ही झुंज यशस्वी ठरली.
महेशची मानसिक अवस्था दहावीमध्ये असतानाच खालावली. डिप्रेशनच्या गर्तेतून सुरू झालेला प्रवास पुढे स्किझोफ्रेनियामध्ये बदलला. त्याच्या वागण्यात असामान्यता, चिडचिडेपणा, हिंसकपणा दिसू लागला. परिस्थिती बिघडत चालल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आदित्य जैन, डॉ. सौरभ भूतांगे, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा आणि डॉ. रूचिता आटे या तज्ज्ञांच्या टीमने स्किझोफ्रेनियाचे अचूक निदान करत विशेष उपचारांची मालिका सुरू केली. रुग्णावर ईसीटी (इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव्ह थेरपी) ही उपचारपद्धती वापरण्यात आली, ज्यामुळे त्याच्या मेंदूच्या कार्यप्रणालीत सकारात्मक बदल दिसू लागले. काही दिवसांतच त्याच्या वागण्यात सुधारणा झाली, आणि समुपदेशनाच्या साहाय्याने मानसिक संतुलनही पुन्हा प्राप्त झाले.
उपचारानंतर महेश आता पुन्हा आपल्या नेहमीच्या जीवनशैलीकडे परतला आहे. त्याच्या पालकांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले आहेत. ही घटना म्हणजे मानसिक विकारांबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित करणारी ठरते. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास, अगदी गंभीर मानसिक आजारांवरही मात करता येते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.