
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील एका ४५ वर्षीय कष्टकरी तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. संजय मणिलाल पाटील (रा. आव्हाणे ता. जळगाव ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीर आहे.

संजय पाटील हे एका मिस्तरीकडे कामाला होते. मंगळवारी ३ मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावातील काम आटोपून ते पायी आपल्या आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून येत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत संजय यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
आव्हाणे परिसरात गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असतो. या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल आणि धोकादायक डोह तयार झाले आहेत. याच डोहाचा अंदाज न आल्याने संजय पाटील यांचा पाय घसरून मृत्यू झाला, असा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मयत संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, १० वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे.याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.



