धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या उपरसिंग करमसिंह बारेला (वय २१, रा. झिरपन, ता. वरला, जि. मध्यप्रदेश, ह.मु. पिंप्री, ता. धरणगाव) या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपरसिंग मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात जळगावकडे दुचाकीने येत असलेले बापुराव महादू पाटील (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता पाटील (वय ४५, दोघे रा. पिंप्राळा, जळगाव) हे देखील जखमी झाले होते.
पाळधीहून धरणगावकडे जाणाऱ्या उपरसिंगच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या बापुराव पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक लागली होती. या अपघातात मगन पुन्या बारेला (वय २५) हा देखील जखमी झाला होता.
गंभीर जखमी उपरसिंगला तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही त्याला वाचवता आले नाही.