जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘मेघा कंपनीत काम’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कानळदा येथील एका तरुणाची २ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदा दगडू सपकाळे (वय ३९, रा. कानळदा, ता. जळगाव) हे आपल्या कुटुंबासह राहतात आणि शेती तसेच जेसीबी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. एप्रिल २०२५ मध्ये त्यांची ओळख सोपान पोखरकर नावाच्या व्यक्तीशी झाली. पोखरकरने सपकाळे यांचा विश्वास संपादन केला आणि ‘मेघा कंपनी’मध्ये काम मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपये घेतले.

पैसे घेऊनही पोखरकरने सपकाळे यांना काम दिले नाही. जेव्हा सपकाळे यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा पोखरकरने त्यांना फोन करून धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आनंदा सपकाळे यांनी तात्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी फिर्याद दिली.
त्यानुसार, गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करत आहेत.



