जळगाव प्रतिनिधी । शिक्षणासाठी भावाकडे राहणाऱ्या विद्यार्थींनीशी रस्त्यावर वाद घालून तिच्या डोक्यात विट मारून जखमी केले त्यानंतर स्व:तच्या घरात डांबून ठेवत मारहाण करणाऱ्या स्वप्नील केदार याला जिल्हा न्यायालयाने दोन महिन्याची कैद सुनवली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मुळ फिर्यादी ही शिक्षणानिमित्त तिच्या भावाकडे राहत असतांना (ता. १७ जाने २०१५) रोजी स्वप्निल केदार याने मुळ फिर्यादी युवतीस फोन करुन धमकी दिली की, तु माझे घरी का सांगितले, मी तुला आता जीवंत सोडणार नाही. मी आता तुझे घरी येतो. त्यामुळे सदरची युवती घाबरुन गेल्यामुळे ती पोलीस स्टेशनला जात असतांना स्वप्निल केदार हा त्याच्या मित्रासह दुचाकीने शोध घेत तिला गाठले. दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडून स्वप्निल केदार याने विट उचलुन त्या विद्यार्थींनीच्या डोक्यात हाणली. त्यात जखमी होवुन तरुणी खाली बसली, ती रडत असतांना स्वप्नीलने बळजबरी दुचाकीवर बसवुन तीला त्याच्या घरी घेवून आला. दवाखान्यात न घेवुन जाता त्या तरुणीला घरातच डांबुन ठेवले.
संधी मिळताच मुलीने तिच्या घरी वडीलांना कळविल्यानंतर वडीलांनी भावाला तिचा शोध घेण्यास पाठवले. मुलीच्या भावाने तिला स्वप्निलच्या घरी जावुन सोबत घेत थेट रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरुन स्वप्निल केदार आणि त्याचा मित्र कपिल दिलीप बागळे अशा दोघांच्या विरुध्द (११/२०१५, भा.द.वि. कलम ३०७, ४५२, ३४१, ३४२, ५०४, ५०६ नुसार )गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते.
सत्र न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयासमोर कामकाज होवुन सरकारपक्षातर्फे ॲड. प्रदिप महाजन यांनी जखमी विद्यार्थींनी, उपचार करणारे डॉक्टरर्स, प्रत्यक्षदर्शी अशा एकूण ०९ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.प्राप्त साक्ष-पुराव्यांच्या आधारे संशयीत स्वप्नील केदार याच्या विरुद्ध गुन्हा शाबीत होऊन (कलम-३२३) अन्वये २ महिने साधी कैद, कलम-३४२ अन्वये १ महिना साधी कैद, कलम-३४२ अन्वये २ महिने साधी केद, कलमज्-५०६ अन्वये २ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. खटल्यात पैरवी अधीकारी ताराचंद जावळे, निलेश दंडगव्हाळ यांनी सहकार्य केले.