जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मित्रांसोबत गेलेल्या गौरव नेरकर (वय २१, रा. खंडेराव नगर) याचा पाय घसरुन धबधबा कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सोमवारी २२ जुलै रोजी त्याचा मृतदेह मिळून आला. जळगाव शहरातील खंडेराव नगरात गौरव नेरकर हा तरुण आपल्या मित्रांसह सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. धबधब्याखाली गौरवचा पाय घसरला आणि तो कुंडात बुडाला. ही घटना त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली.
घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले.
काही वेळानंतर गौरवचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ बनोटी रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
गौरवच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर सायंकाळच्या सुमारास गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.