वसई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काशिमीरा येथे क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे.राम गणेश थेवर (४२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राम हा मिरा रोड येथील जहांगीर गृह संकुलाचे रहिवासी होता. त्याला पूर्वीपासूनच क्रिकेटची आवड असून तो उत्तम फलंदाज होता, अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
रविवारी काशिमिरा येथील मीनाक्षी फार्म हाऊसमध्ये जे.वी.पी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या वार्षिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फार्म हाऊस मधील टर्फवर कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यात राम हा फलंदबाजी करत होता. यावेळी एका चेंडूत पूर्ण जोर लावून त्याने षटकार मारला. मात्र त्यानंतर अचानक मैदानावर कोसळला. इतर सहकारी खेळाडूंनी तातडीने त्याला जवळील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.