Home क्राईम भीषण अपघातात तरूणाचा दुदैवी मृत्यू; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले, दुसरा गंभीर

भीषण अपघातात तरूणाचा दुदैवी मृत्यू; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले, दुसरा गंभीर

0
166

चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून यात्रेहून परतत असताना झालेल्या एका भीषण अपघातात अवघ्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चोपडा-वेले मार्गावरील एका साखर कारखान्याजवळ घडली.

मयत तरुणाचे नाव दिशांत दीपक पाटील (वय १८, रा. अकुलखेडा, ता. चोपडा) असून, जखमी झालेला तरुण चेतन उदय भदाणे (वय १८, रा. भोईवाडा, चोपडा) आहे. दिशांत आणि चेतन हे दोघे मित्र मोटारसायकलवरून चहार्डी येथील यात्रा पाहण्यासाठी गेले होते. यात्रा आटोपल्यानंतर ते वेले मार्गे चोपड्याकडे परतत असताना साखर कारखान्याजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत दिशांत पाटील याचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन भदाणे जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि अकुलखेडा येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चेतन भदाणे याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माजी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली.

दिशांत पाटील हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अकुलखेडा गावावर शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात ९ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता अकुलखेडा येथे दिशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिशांतच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विशेष म्हणजे, गेल्या केवळ पंधरा दिवसांत अकुलखेडा येथील दुसऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापूर्वी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound