अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढवे फाट्याजवळ रोडच्या कडेला कारचे टायर व डिझेल नॉब चेक करत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने कार चालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ७ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवार ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल परमेश्वर निगडे वय ४० रा. साक्री रोड, धुळे असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल निगडे हे आपल्या कुटुंबासह साक्री रोड धुळे येथे वास्तव्याला आहे. मंगळवारी ७ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सुनिल निगडे हे त्यांची कार क्रमांक (एमएच १८ एजे ९११९) जात होते. त्यावेळी लोंढवे फाट्याजवळ रस्त्याच्याकडेला कार लावून कारचे चारही इंडीकेटर सुरू करून कारचे मागचे टायर आणि डिझेलचे नॉब चेक करत होते. त्यावेळी अमळनेर करून धुळेकडे जाणारी भरधाव दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीसी ६७१) ने सुनिल निगडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवार ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता दुचाकीधारक किरण मोतीलाल चौधरी रा. अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे. **