Home क्राईम रथ यात्रेतून मंगळसूत्र लांबविणारी सराईत महिला चोर जेरबंद; रावेर पोलीसांची कारवाई

रथ यात्रेतून मंगळसूत्र लांबविणारी सराईत महिला चोर जेरबंद; रावेर पोलीसांची कारवाई


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात ५ डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक रथ यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या एका सराईत महिलेला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून चेहरा स्पष्ट होत नसतानाही, पोलिसांनी नागरिकांनी काढलेल्या मोबाईल व्हिडिओच्या मदतीने या गुन्ह्याचा २४ तासांत छडा लावला.

रावेर पोलीस स्टेशनमध्ये ६ डिसेंबर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी नागे पल्लवी विशाल पाटील (रा. शिवाजी चौक, रावेर) या रथयात्रेत दर्शनासाठी गेल्या असताना, त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले. तपासणीदरम्यान याच परिसरात सौ. राजश्री चौधरी आणि रोहिणी भिडे यांच्याही गळ्यातील मंगळसूत्रे चोरीस गेल्याचे लक्षात आले.

अटक आणि तपास पद्धत गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पथकाने सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु गर्दीमुळे चोरट्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरत रथ यात्रेत सहभागी नागरिकांनी काढलेल्या मोबाईल शूटिंग व फोटोंचा अभ्यास केला. एका व्हिडिओमध्ये संशयित महिलेचे वर्णन आणि राहणीमान स्पष्ट दिसले.

या आधारावर, पोलिसांनी संपूर्ण यात्रेच्या परिसरात संशयित महिलेचा शोध सुरू केला. लवकरच ही महिला संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आली. तिला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल काढून दिला.

आरोपीची ओळख अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव संजना रोहेल शिंदे (वय २०) असून, ती मूळची हसनाबाद (ता. भोकरदन, जि. जालना) येथील असून सध्या भोईसर (जि. ठाणे) येथे राहत असल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी संजना शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मीस देशमुख करीत आहेत.


Protected Content

Play sound