जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोलमजूरी करु न आईवडीलांनी मुलीला शाळेत जाण्यासाठी जूनी सायकल खरेदी करुन दिली. मात्र आगीत सायकलसह दुचाकी जळून खाक झाल्याने मुलीने पोलिसांकडे खंत व्यक्त केली. चिमुकलीने व्यक्त केलेली खंत पोलिसाच्या मनाला लागल्याने त्यांनी लागलीच आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने मुलीला नवीन सायकल घेवून देत खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले.
जळगाव शहरातील माधव नगरात अमोल रमेश जंगले हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे असलेल्या (एमएच १९, बीझेड ३६९८) क्रमांकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. यामध्ये दुचाकीसह त्यांची मुलगी अक्षरा हीचे सायकल देखील जळून खाक झाली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रविंद्र परदेशी व पोहेकॉ विजय पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. या चिमुकलीची शाळा तिच्या घरापासून सुमारे सहा किमी लांब होती. तीची सायकल जळून खाक झाल्याने चिमुकल्या अक्षराला पायीच शाळेत जावे लागत होते. रविंद्र परदेशी व विजय पाटील या दोघ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत व चिमुकलीच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होवू नये. म्हणून लागलीच त्यांनी संदीप इंधाटे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्र्वर गावंडे, भूषण पाटील, अविनाश पाटील, बंटी राणे, गिरीश पाटील या उद्योजकांनी मदतीचा हात पुढे करीत चिमुकलीला नवीन सायकल भेट दिली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह उद्योजकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी चिमुकल्या अक्षराला नवीन सायकल भेट दिली. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण बघून तिच्या कुटुंबिय भावूक झाले झाले होते.