जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गाणे लावण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांना लाठ्याकाठ्या, लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. तसेच घरात घुसून साहित्याची नासधस करण्यात आली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्रकरणी गुरूवारी १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अनिता किरण ढिवरे (३०, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गाणे लावण्यावरून विचारणा करीत सहा जणांनी अनिता ढिवरे यांच्यासह त्यांचे दीर जितू ढिवरे यांना शिवीगाळ करीत लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच घरात घुसून साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी किरण वसंत सपकाळे, समाधान वसंत सपकाळे, शंकर वसंत सपकाळे, करण वसंत सपकाळे, मंगलाबाई वसंत सपकाळे आणि मनोज वसंत सपकाळे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी फिर्याद किरण सपकाळे यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की, त्यांना उद्देशून आम्ही कोणतेही गाणे लावू, तू आम्हाला बोलणारा कोणे असे म्हणत दोन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी जितू ढिवरे, राणी जितू ढिवरे आणि अनिता किरण ढिवरे या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




