जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका परिसरातून अवैधरित्या मालवाहू वाहनातून बैलांची कोंबून वाहतूक करणारे वाहन शनिपेठ पोलिसांनी रविवारी २ जून रोजी दुपारी १२.३० वाजता पकडले. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरीनाका परिसरातून मालवाहू वाहनातून दोन बैलांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी २ जून रोजी दुपारी १२.३० वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ६९१) पकडले. त्यावेळी चालक सचिन रवींद्र चौधरी वय-२२ आणि आकाश अरुण सोनवणे वय-२३ रा. चोपडा यांच्याकडे बैल वाहतूक करण्याबाबत परवाना विचारला. त्यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना मिळाला नाही. तसेच त्यांनी दोन्ही बैलांना निर्दयपणे घट्ट बांधून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वाहन जप्त करून दोन्ही बैलांची सुटका केली. याप्रकरणी पोहेकॉ गिरीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन चौधरी आणि आकाश सोनवणे या दोघांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे हे करीत आहे.