जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिसांची नियमीत तपासणी अथवा कोंबींग ऑपरेशनमध्ये अनेकदा वाहनधारक हे आपली ‘पोहच’ दाखवून यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. आज मात्र जळगावात पोलिसांना वेगळाच अनुभव आला.
जिल्हा दुध संघाचे संचालक तथा गिरीशभाऊ महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख हे आपल्या चारचाकी वाहनातून आकाशवाणी चौकातून जात असतांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यांच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तीन हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी तातडीने तो ऑनलाईन ट्रान्सफर करून टाकला. यानंतर त्यांनी उपस्थितांना आपली ओळख सांगितली तेव्हा ते थक्क झाले.
आपल्या पदाची अथवा राजकीय कनेक्शनची ओळख दाखवत पोलिसांवर दबाव टाकणारे अनेक राजकीय पदाधिकारी आपण नेहमीच पाहत असतो. मात्र अरविंद देशमुख यांच्यासारख्या खऱ्या अर्थाने मोठी पोहच असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याने दाखविलेला समंजसपणा हा खरोखर कौतुकास्पद असाच मानावा लागणार आहे.