मुंबई, वृत्तसंस्था | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांचे जोरदार शक्तीप्रर्दशन केले. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची मीडियासमोर परेड करण्यात आली. यावेळी सगळ्यांना एकजूट राहण्यासाठी भावनिक शपथ देण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते. त्यामुळे हॉटेल ग्रँड हयातमध्ये मिनी विधानसभाच भरल्याचे चित्र दिसत होते. आज या तिन्ही पक्षांनी केलेली आमदारांची ही परेड हा राज्यपालांवरील दबावतंत्राचा एक भाग असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकाच मंचावर आले होते. यावेळी मंचावर संविधान ठेवण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार यावेळी उपस्थित होते.