भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील राजस्थान मार्बल दुकानासमोरून गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारे ट्रक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये जनावरांना इजा होईल अशा पद्धतीने कोंबून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील राजस्थान मार्बल समोरील रोडवरून ट्रक क्रमांक (एमएच ०४ एफडी ६११९) यामध्ये गुरांना इजा होईल अशा पद्धतीने कोंबून त्यांची वाहतूक होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने कारवाई करत ट्रक पकडला. यामध्ये ३ लाख ४२ हजार किमतीचे गुरांची कोंबून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे, तर जनावरांची सुटका करण्यात आली. याबाबत प्राणीमित्र रोहित महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक सचिन भारत वाघ (वय-३५) आणि गणेश संतोष पवार (वय-२९) दोन्ही रा. रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र भावसार करीत आहे.