शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नागरिक, व्यापारी, पत्रकार व राजकिय पक्षाचे वतीने आज नगरपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत स्वयंस्फूर्तीने येत्या बुधवारपासून म्हणजेच (दि.१७ मार्च) बुधवारपासून तीन दिवसीय जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येणाऱ्या या लॉक डाउन मध्ये किराणा, भाजीपाला व इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल,दवाखाने सुरू राहतील तर दूध डेअरी सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ या वेळात सुरू राहतील लॉक डाउन दरम्यान अत्यावश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच विना मास्क कोणताही नागरिक रस्त्यावर फिरतांना आढळल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीत नागरिकांना विना मास्क फिरता येणार नाही तसेच व्यापारी व त्यांचे कामगार, लोक प्रतिनिधी, पत्रकार, डॉक्टर यांना मास्क वापरा बरोबरच नागरिकांमध्ये मास्क वापरण्यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.सद्या स्थितीत राज्यात व जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रचंड प्रमाणात प्रसार होत असून काही नागरिकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे.
अश्या स्थितीत नागरिकांनी स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी प्रत्येक घरात एक तरी व्यक्तीची अँटिजेन चाचणी करून घ्यावी असे आवाहन गोविंद अग्रवाल यांनी केले ,तर नगरपंचायतच्या वतीने विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे कडून दंड वसूल करतांना मास्क द्यावा ही विलास अहिरे यांची सूचना मान्य करून कारवाई करण्यात येईल असे अमृत खलसे यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ , नगराध्यक्ष पती अमृत खलसे, उपनगराध्यक्ष पती गोविंद अग्रवाल, जेष्ठ नेते उत्तम थोरात,डॉ. विजयानंद कुलकर्णी, व्यापारी संघटना अध्यक्ष तजय अग्रवाल,धीरज जैन,नगरसेवक अलीम तडवी,सतीश बारी,गणेश जोहरे, राहुल धनगर,पत्रकार विलास अहिरे,दिग्विजय सुर्यवंशी, अतुल जहागीरदार, दीपक जाधव,संतोष महाले,व्यापारी काजेश कोटेचा, संदीप ललवाणी,गिरीश कुलकर्णी,राजेश अग्रवाल,व नागरिक नगरपंचायत अभियंता काझी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी काही सूचना केल्या त्या स्वीकारत लॉक डाउन काळात कडकडीत बंद व सोशीयल डिस्टन्स नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोनि. राहुल खताळ यांनी केले.