जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ट्रान्सपोर्ट नगरात दुकानावर चहा करीत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका चहा विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते स्टोवर पडल्याने त्यांच्या मानेजवळ भाजल्या गेले. ही घटना शुक्रवारी (११ ऑक्टोबर) ट्रान्सपोर्टजवळ घडली. अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मयत झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर ते चहा करण्यासाठी दूध गरम करीत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.