
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटातून दमदार कमबॅक करत पुन्हा एकदा आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. या चित्रपटातील त्याच्या रहमान डकैतच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून, अभिनयासोबतच त्याच्या डान्स मूव्ह्सचीही जोरदार चर्चा सुरू आहे. ४० हून अधिक चित्रपटांच्या कारकिर्दीत अक्षय खन्नाला मिळालेला हा सर्वात मोठा हायप मानला जात आहे.

मात्र आज ज्या उंचीवर अक्षय खन्ना पोहोचलेला दिसतो, त्या प्रवासात काही संधी अशाही होत्या ज्या त्याच्या हातातून निसटल्या. यातीलच एक मोठी संधी म्हणजे २००७ साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट. आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक क्लासिक मानला जाणारा हा चित्रपट प्रत्यक्षात अक्षय खन्नासाठी लिहिला जात होता, ही बाब अनेकांना माहीत नाही.
‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांची पहिली पसंती आमिर खान नव्हे, तर अक्षय खन्ना होता. मात्र अमोल गुप्ते आणि अक्षय खन्ना यांची वैयक्तिक ओळख नसल्याने त्यांनी आमिर खानकडे मदतीसाठी धाव घेतली. आमिर आणि अक्षय यांनी याआधी एकत्र काम केलेले असल्यामुळे, अमोल यांनी आमिरला अक्षयशी संपर्क साधण्याची विनंती केली होती.
एका मुलाखतीत अक्षय खन्नाने या प्रसंगाचा खुलासा केला होता. अमोल गुप्ते यांना मला स्क्रिप्ट नरेशन द्यायचे होते, मात्र ते मला ओळखत नव्हते. त्यामुळे त्यांनी आमिर खानला सांगितले की तू अक्षयला फोन कर, मी त्याला गोष्ट ऐकवतो, असे अक्षयने सांगितले. मात्र यावर आमिर खानने वेगळाच निर्णय घेतला.
आमिर खानने स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत मी स्वतः स्क्रिप्ट ऐकत नाही, तोपर्यंत मी कोणालाही शिफारस करणार नाही. मला आधी गोष्ट ऐकवा, जर ती मला आवडली तर मी बोलेन. त्यानंतर अमोल गुप्ते यांनी आमिरला स्क्रिप्ट ऐकवली आणि आमिरला ती इतकी आवडली की त्याने स्वतःच हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर ‘तारे जमीन पर’ आमिर खानच्या नावावर गेला आणि तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय चित्रपटांपैकी एक ठरला. अवघ्या १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल ९८.५० कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. परिणामी, आमिर खानच्या निर्णयामुळे अक्षय खन्नाच्या हातातून एक मोठा आणि आयकॉनिक हिट चित्रपट निसटला.



