

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील धुळे-जळगाव सर्विस रोडवर एका दुचाकीधारकाने ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या स्कुटीला धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत बाबुराव पाटील (वय ६२, रा. गणेश कॉलनी, जळगाव) हे या अपघातात जखमी झाले आहेत. गुरूवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास यशवंत पाटील हे त्यांच्या स्कुटी क्रमांक (MH १९ DG ५१८८) वर एमजे कॉलेजजवळील एका डेअरीतून दूध घेऊन घराकडे परत येत होते.
शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजजवळून वळण घेऊन गणेश कॉलनीकडे येत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या (MH-१९-EL-७२५६) या क्रमांकाच्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या स्कुटीच्या हँडलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे यशवंत पाटील खाली पडून जखमी झाले. अपघात झाल्यानंतर मोटारसायकल चालकाने जखमी अवस्थेतील यशवंत पाटील यांना कोणतीही मदत न करता तसेच अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून त्वरित पळ काढला. या गंभीर निष्काळजीपणामुळे फिर्यादी यशवंत पाटील यांच्या जबाबावरून दुसऱ्या दिवशी, २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



