भुसावळ प्रतिनिधी । दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ५०० मेगावॅट संचांत हॉपर हिटरच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ३० वर्षीय कर्मचारी भाजल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५०० बाय दोनच्या संचातील हॉपर हिटर दुरुस्तीचे काम केले जात होते. याच दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने महानिर्मितीचा कर्मचारी सचिन शिंदे (वय ३०) रा. दीपनगर हा भाजला गेला. त्याच्या डावा हात, चेहरा, डोक्यावरील केस जळाले. त्यात सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ भुसावळ येथील रिदम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.
त्याच्यावर प्रथमोचार करुन त्यास जळगाव येथील हॉस्पीटलमये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दीपनगरात सातत्याने किरकोळ अपघात घडतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान जखमी सचिनचे लग्न ठरले असून आगामी दोन, तीन महिन्यांत लग्न होणार होते, यापूर्वीच हा अपघात झाला, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.