ठाकरे गटाला धक्का; ज्येष्ठ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने चांगले प्रदर्शन करत शिंदे गटावर कुरघोडी केली. लोकसभेच्या 9 जागा ठाकरेंच्या पदरात पडल्या. एक जागा थोडक्यात हरली. तर शिंदेंच्या पदरात 7 जागा आल्या. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतानाही त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी शिंदे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिला धक्का त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे हिंगोलीत शिंदे गटाची ताकद नक्कीच वाढली आहे. जेष्ठ नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. पक्षाचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी झाले. त्यांनी शिंदेंच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. हा पराभव शिंदेंच्या जिव्हारी लागला. असे असतानाच शिंदेंनी आता ठाकरेंना दणका दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जेष्ठ शिवसैनिक आणि माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला आहे. मुंदडा यांच्या प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यात शिंदेंची ताकद नक्कीच वाढणार आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

जयप्रकाश मुंदडा हे गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात नाराज होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुंदडा यांनी ठाकरेंना साथ दिली. पण त्यांची उपेक्षा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी मिळाली असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांच्या ऐवजी नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुंदडा नाराज होते. त्याच वेळी ते शिंदे गटात प्रवेश करणार होते. मात्र थांबा आणि पाहा ही भूमीका त्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत जनतेने ठाकरेंना कौल दिला. अखेर मुंदडांना शिंदे गटात प्रवेश करण्या शिवाय पर्याय राहीला नाही.

जुने जाणते शिवसैनिक म्हणून जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे. ते युतीची सत्ता असताना सरकारमध्ये सहकार आणि वस्रोद्योग मंत्री होते. 1990 पासून सलग चार वेळा मुंदडा हे विधानसभेवर निवडून आले होते. सलग चार वेळा त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या त्यांची ठाकरे गटात घुसमट होत होती. शेवटी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे

Protected Content