‘छावा’ सिनेमातील ‘त्या’ एका सीनमुळे थिएटरमधील स्क्रीनच फाडली

भरूच -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सध्या सिनेसृष्टीत एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, तो म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेची सशक्त रूपरेखा सादर केली आहे. चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चित्रपटात दाखवलेल्या एका सीनमुळे एक गंभीर घटना घडली आहे, ज्यामुळे थिएटरमधील स्क्रीनच फाडली गेली.

गुजरातमधील भरूच शहरात असलेल्या आरके चित्रपटगृहामध्ये रविवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ‘छावा’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी ही घटना घडली. सिनेमा सुरू असताना एका सीनमुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चाहत्याला राग अनावर झाला आणि त्याने थिएटरमधील स्क्रीनच फाडून टाकली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चाहतावर्गाचा क्रोध एवढा वाढला की त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने स्क्रीन फाडली. त्यानंतर थिएटरचे कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्या चाहत्याला तातडीने बाहेर काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात फेब्रुवारी १६८९ मध्ये संगमेश्वर येथे आणि औरंगजेबाच्या हातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शिरच्छेदाचा सीन दाखवण्यात आलेला होता. हा सीन पाहून जयेश वासवा नामक चाहत्याला राग अनावर झाला आणि त्याने आपला गुस्सा व्यक्त केला. सिनेमात असलेल्या औरंगजेबाच्या अत्याचारांना पाहून जयेश अग्निशामक यंत्राचा वापर करत स्क्रीनच्या दिशेने धावला आणि त्याने त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या आक्रमक कृत्यामुळे थिएटरमधील स्क्रीन फाटली.

थिएटरचे जनरल मॅनेजर आरव्ही सूद यांनी या प्रकरणी सांगितले, “ब्लूचिप सिनेमाच्या कर्मचाऱ्यांकडून मला फोन आला की एका ग्राहकाने अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने स्क्रीन फाडली आहे. त्यानंतर मी तातडीने त्याला बाहेर काढण्याचे आदेश दिले. यामुळे इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.” त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि घटनेची नोंद केली.

या घटनेमुळे थिएटरमालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. जवळपास १.५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समजते. या घटनेमुळे, रविवारी रात्री सिनेमाला आलेल्या इतर प्रेक्षकांना शेजारच्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची ऑफर देण्यात आली होती. काही प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटांची रक्कम परत करण्यात आली. जयेश वासवाच्या या कृत्यामुळे थिएटरमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे इतर दर्शकांना एक मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, जयेश वासवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content