यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजातील जुन्या रूढी-परंपरांना बाजूला सारत आणि कर्तव्याचा नवा आदर्श निर्माण करत अंजाळे (ता. यावल) येथील नीता वाघ यांनी आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. समाजातील “वंशाचा दिवा” ही संकल्पना बाजूला सारत मुलीनेच आपल्या पित्याला अग्निडाग दिला आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला.
प्रमोद प्रल्हाद सपकाळे यांना पुत्र नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. मात्र त्यांच्या भगिनी उज्ज्वला वाघ व प्रतिभा भालेराव यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली होती. या कठीण प्रसंगी नीता वाघ आणि स्वाती वाघ या दोन महिलांनी पुढाकार घेतला. सचिन वाघ आणि नायक भालेराव यांनीही निर्णय घेऊन परंपरेला छेद दिला आणि मुलीस अग्निडाग देण्याची संमती दिली.
नीता वाघ यांनी आपल्या पित्याला स्वतः अग्निडाग दिला, तर स्वाती वाघ यांनी खांदा दिला. त्यांच्या या धाडसी निर्णयाने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. समाजाने लादलेल्या जुन्या परंपरांना फाटा देत सावित्री-रमाईच्या लेकींनी जबाबदारी पार पाडली आणि मुलीही अंतिम संस्कार करू शकतात, हे सिद्ध केले. ही घटना समाजासाठी एक नवा आदर्श आहे, जिथे पुत्र आणि पुत्री यांच्यात भेदभाव न करता समानतेची भावना पुढे येते. समाजातील कालबाह्य परंपरांना शह देत महिलांनी आपल्या कर्तव्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.