दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अज्ञात दुचाकीस्वाराने एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता खोटेनगर जवळील गिरणा गार्डनसमोर घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भिकन शामराव नन्नवरे वय-४८, रा. बांभोरी ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गिरणा गार्डन समोरील राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी भिकन नन्नवरे हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत होते. त्यावेळी एका दुचाकी स्वार क्रमांक (एमएच १९ सीए ८४१३) 13 वरील चालकाने त्यांना धक्का दिला. त्यावर त्यांनी दुचाकीस्वाराला जाब विचारला. याचा राग आल्याने अज्ञात दुचाकी स्वाराने भिकन नन्नवरे यांना शिवीगाळ करत बाजूला पडलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत भिकन नन्नवरे यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Protected Content