Home Uncategorized अट्टल चोरट्याला अटक; ४० लाखांचे सोने, पिस्तूल आणि १६ दुचाकी जप्त!

अट्टल चोरट्याला अटक; ४० लाखांचे सोने, पिस्तूल आणि १६ दुचाकी जप्त!


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांत चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इराणी टोळी’वर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राबवलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये पोलिसांनी ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि १६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला :
घटनेची सुरुवात १५ जानेवारी रोजी झाली, जेव्हा मध्यप्रदेशातील बडोद पोलीस ठाण्याचे पथक करारअली हुजूर अली या आरोपीला पकडण्यासाठी भुसावळात आले होते. यावेळी जुल्फिकार अली ऊर्फ श्री इराणी याच्या घराजवळ १५ ते २० महिला आणि पुरुषांच्या जमावाने पोलिसांना घेरले. जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत पोलिसांवर विटा आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. काही महिलांनी पोलिसांना पकडून त्यांचा चावा घेतला, तर काहींनी “तुमची नोकरी घालवू” अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

कोंबिंग ऑपरेशन आणि सोन्याच्या लग्गडी जप्त :
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बाजारपेठ पोलिसांनी परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. घरझडती दरम्यान मरियम बी जाफर अली जाफरी आणि नाझिया टिपू शेख यांच्या घरातून २८७.७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लग्गडी सापडल्या. चौकशीत धक्कादायक खुलासा झाला की, या टोळीतील हसनअली ऊर्फ आसू, सादिक ऊर्फ आतंक आणि इतरांनी जळगाव जिल्हा, अमरावती आणि मध्य प्रदेशात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून आणले होते. या दोन महिला ते दागिने वितळवून सोन्याच्या लग्गडी तयार करत असत.

मोठा शस्त्रसाठा आणि मुद्देमाल हस्तगत :
कारवाईदरम्यान मजहर अब्बास जाफर इराणी याच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या १६ मोटारसायकलीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा आणि अमळनेर येथील तब्बल १६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राहुल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound