नवी दिल्ली वृत्तसंस्था । धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकार नवीन कायदा तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून यात अनेक महत्वाचे बदल करण्यात येणार असल्याची माहिती याच्या मसुद्यातून समोर आली आहे.
केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात आणि नियमन) संशोधन कायदा २०२० या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यात अनेक महतवाचे बदल करण्यात येणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करण्यासाठीचे वय १८ वरुन २१ वर्षे करण्यात येणार आहे.
या नव्या विधेयकामध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थानाच्या १०० मीटरच्या परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच या नव्या विधेयकाच्या माध्यमातून सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांना विकण्यासाठी निश्चित मात्रा ठरवण्यात येणार आहे. सिगारेट तसेच तंबाखूजन्य उत्पादनाचे उत्पादन, पुरवठा, वितरणावर सरकारचे नियंत्रण असणार आहे. उत्पादन, पुरवठा, वितरणाचे प्रमाण ठरवून दिल्यानंतरच सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करता येणार आहे.
तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायद्यातील कलम ७ चे उल्लंघन केल्यानंतर शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाईचीही तरतूद या नव्या कायद्यात करण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार नव्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.