Home क्राईम खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू

खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे डोहरी तांडा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत इसमाचे नाव उदय हरी तवर (वय 47) असून ते नेहमीप्रमाणे रविवारी (13 एप्रिल) संध्याकाळी सात वाजता कामावरून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते.

उदय तवर हे जामनेरहून डोहरी तांडा गावाकडे जात असताना खादगाव रस्त्यावर, जामनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे समजते. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रताप मथुरे हे करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


Protected Content

Play sound