जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे कृषी विज्ञान केंद्रात काम करणाऱ्या मजुराचा शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरुण पंडित सूर्यवंशी (वय ४३, रा. अभय कॉलेजजवळ, धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुलांसह राहतो. जळगाव तालुक्यातील तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात मजूर म्हणून कामाला होता. शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळाजवळ खंबा क्र. ४१८/२३ जवळ कर्नाटक एक्स्प्रेसखाली येऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. तेथून विदारक अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोलिसांनी दाखल केला होता.
या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून सदर इसमाची ओळख पटवली. मयत अरुण सूर्यवंशी याचे शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.