जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील मुला-मुलींच्या बालगृहात दाखल असलेल्या अनाथ, निराधार व वंचित बालकांची दिवाळी यंदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात बालकांना कपडे, शूज, मिठाई, फराळ, भेटवस्तू आणि आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्या प्रयत्नांतून ७ नोव्हेंबर रोजी दिवाळी ग्रँड सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुला-मुलींनी आकर्षक फटाके सामूहिक पद्धतीने फोडत दिवाळीचा आनंद लुटला. बालगृह परिसरात आकर्षक रोषणाई, पणत्या, दिवे, आकाशकंदील, फुलमाळा आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला वर्ग १ न्यायाधीश एस. के. खोंगल, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एन. बडगुकर, न्यायाधीश वाळके, बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव, बालगृह अधीक्षिका सुनंदा पटेल, संस्थेचे मानद सचिव सुनील पाटील यांच्यासह बालगृहातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.
बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांना सणाचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमयी ठरली.