भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विल्हाळे तलावाच्या खोलीकरणाचे सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून या भागातील जलसाठ्यांमध्ये साचलेली राख हटवून ते प्रदुषणमुक्त करण्यात यावे, अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘प्रदुषण हटाव पर्यावरण बचाव’ संयुक्त समितीने दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ‘गावर’ या कंपनीला विल्हाळे तलावाच्या खोलीकरणाचे काम दिले होते, तेव्हा त्याचा खरा उद्देश २० वर्षांपासून दीपनगर औष्णीक विदुयत केंद्राची राख वाहून नेणारी पाईप लाईन फुटून झालेले राखेचे प्रदूषण दूर करणे हा होता. विल्हाळे तलाव व परिसरात जमा झालेली राख, मुरूम व माती चौपदरी कारणासाठी वापरून तलावाचे खोलीकरण करून तो प्रदूषणमुक्त करणे त्यामुळे अपेक्षीत होते. याकार्यात विल्हाळे तलावाचे २० ते ३० हेक्टर खोलीकरण होऊन जलसाठा वाढून परिसरातील शेतीला फायदा होने अपेक्षित होते.
प्रत्यक्षात गावर कंपनीच्या सुपरवायझरने मात्र आपल्या मालकीच्या शेतात चांगल्या प्रतीचा गाळ टाकण्यासाठी, एका बाजूने समसमान खोलीकरण न करता अनेक ठिकाणी ३० ते ४० मीटर लांब व चार ते पाच मीटर खोल असे जीवघेणे खड्डे तयार करून प्रत्यक्षात खोलीकरण मात्र दोन ते तीन हेक्टर एवढेचे केले आहे. या सर्व कामाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले असून काम अपूर्ण राहिले आहे.
विल्हाळे तलावात व नदी नाल्यांमध्ये जमा झालेली राख तात्काळ काढण्यात येऊन तलाव व परिसर प्रदूषणमुक्त करावा, अन्यथा येत्या १५ आगस्टला परिसरातील जनतेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा ‘प्रदुषण हटाव पर्यावरण बचाव’ संयुक्त समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी दिला आहे.