पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथील एका उच्चशिक्षित एमबीए ग्रॅज्युएट नवविवाहित तरुणाने स्वतःच्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पत्नीच्या खुनाचा गुन्हा लपवण्यासाठी या तरुणाने चोरीचा बनावही रचला होता. परंतु पोलीस तपासात त्याचे बिंग फुटल्याने अखेर सत्य समोर आले आहे. स्वप्नील शामराव रणपिसे असे आरोपीचे नाव असून त्याच्या मृतक पत्नीचे नाव शीतल असे आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याचा गुन्हा आरोपीने पोलीसांसमोर मान्य केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील रहिवासी स्वप्नील शामराव रणपिसे हा रसायनशास्त्र विषयाचा पदवीधर आहे. त्याचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे. आरोपीचे सात महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी तरुण त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या रागातून त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. दरम्यान, हा खून लपवण्यासाठी आरोपीने स्वतःच पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती.
आरोपीने रांजणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्याचे कुटुंबीय बाहेर गेले होते. तो घरी परतले असता दरवाजा आतून बंद असल्याचे त्याला दिसून आले. त्याची पत्नी शीतल हिने दरवाजा न उघडल्याने स्वतः आरोपी स्वप्नील व त्याच्या चुलत भावाने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केला असता शीतलच्या गळ्यात दोर बांधलेला आढळला. शिवाय तिच्या अंगावर विजेचा धक्का दिल्याच्या खुणा दिसून आल्या. दरोड्याच्या उद्देशाने त्याची पत्नी शीतल हिची हत्या केल्याची अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली.
पुणे (ग्रामीण)चे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले होते. जबाब नोंदवताना स्वप्नीलचे त्याच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्याशिवाय स्वप्नीलने जी कहाणी रचली होती त्यात अनेक विसंगती दिसल्यामुळे पोलिसांचा स्वप्नीलवरचा संशय बळावला होता. दरोड्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती घरात घुसले आणि शीतलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिची हत्या करण्यात आल्याची कहाणी स्वप्नीलने रचली होती. मात्र पोलीस घटनास्थळावर गेले असता दरोडा किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संशयाची सुई स्वप्नीलकडेच वळली असं देशमुख यांनी सांगितले. अधिक तपासादरम्यान स्वप्नीलने खुनाची कबुली देत पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिली.