मुंबई (वृत्तसंस्था) सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.
राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देऊन ४८ तासांची मुदत दिली होती. पण शिवसेनेला फक्त २४ तासांत आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी मुदत दिली, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. राज्यपालांनी भाजपच्या आदेशानुसारच हा निर्णय घेण्यास घाई केली, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते . शिवसेनेच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करून सत्तास्थापनेचा दावा केला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र, राज्यपालांनी त्यास नकार दिला. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीने अनिल परब यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर आता उद्या तात्काळ सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.