Home धर्म-समाज साकळीत श्रद्धा-एकतेचा महाउत्सव ; आज संदल तर उद्या दिल्ली-कानपूरच्या कव्वालांची मैफल

साकळीत श्रद्धा-एकतेचा महाउत्सव ; आज संदल तर उद्या दिल्ली-कानपूरच्या कव्वालांची मैफल

0
141


यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साकळी गावात श्रद्धा, भक्ती, सूफी परंपरा आणि हिंदू-मुस्लिम एकतेचे अद्भुत दर्शन घडवणाऱ्या हजरत कुतुब सजनशाह वली (रहेमतुल्लाअलै) यांच्या ७६१ व्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास आज भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या उर्समुळे संपूर्ण साकळी परिसरात उत्साह, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सालाबादप्रमाणे आज बाबांच्या संदल निमित्ताने वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येत असून, या पवित्र सोहळ्यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्राबाहेरून गुजरात व मध्यप्रदेशातून हजारो भाविक साकळीत दाखल झाले आहेत. दर्गा परिसर भाविकांनी फुलून गेला असून, बाबांच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हा उर्स सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता साकळीच्या सामाजिक ऐक्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरवशाली उत्सव ठरतो. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन या सोहळ्याची सेवा करतात, हीच या उर्सची खरी ओळख आहे. आजही सैय्यद मिरा यांच्या वंशपरंपरेनुसार सैय्यद अहमद (मेंबर) यांच्या घरून बाबांच्या पवित्र मझारवर चादर अर्पण करण्याची परंपरा निष्ठेने जपली जाते.

हजरत कुतुब सजनशाह वली (रहे.) यांचे मूळ नाव शाह अ. लतीफ (रहे.) असून, ते ख्वाजा गरीब नवाज अजमेरी (रहे.) यांचे सहकारी म्हणून ओळखले जातात. शेकडो वर्षांपूर्वी साकळीत आलेल्या बाबांचा दगडी बांधकामाचा दर्गा स्थापत्य कलेचा अनोखा नमुना मानला जातो. चारही बाजूंनी सारखाच दिसणारा हा दर्गा अत्यंत आकर्षक असून, येथे मनोभावे केलेली प्रार्थना फळाला येते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

संदल निमित्ताने आज दर्गा परिसरात कय्युमशाह बाबा, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आम लंगर (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असून, सेवाभाव आणि बंधुत्वाची भावना या निमित्ताने अधिक दृढ होत आहे.

उर्स सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी दर्ग्यासमोर भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपसरपंच वसीम खान हाजी आसिफ खान, माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशफाक शौकत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यक्रमात दिल्लीचे सुप्रसिद्ध कव्वाल नौशाद अली खान आणि कानपूरच्या शिबा परवीन यांची रंगतदार जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे.

संदल सोहळ्यानंतर सलग पाच रविवार साकळीत यात्रा भरते. या काळात दर्गा परिसरात पाच बाजार भरविले जात असून, भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हजरत कुतुब सजनशाह वली (रहेमतुल्लाअलै) हे सर्वधर्मीय श्रद्धेचे केंद्र मानले जातात. सध्या दर्ग्याची मुजावरीची जबाबदारी सैय्यद अरमान बाबा, सैय्यद निसार बाबा आणि कबीर बाबा तडवी हे निष्ठेने पार पाडत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी शिस्तबद्धपणे पार पडत आहेत.

श्रद्धा, भक्ती, सूफी संगीत आणि सामाजिक एकतेचा संगम असलेला हा उर्स सोहळा साकळीच्या ओळखीला नवे बळ देणारा ठरत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound