
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर, वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला सोमवारी २८ जुलै रोजी जळगाव येथून उत्साहात सुरुवात झाली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या रॅलीला आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, भरतदादा अमळकर, राजेंद्र नन्नावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

या जनजागृती कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून १०० व्याघ्र दूत आणि यंदा प्रथमच विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावल वनविभागातर्फे सहभागी विद्यार्थी व्याघ्र दूतांना जंगल सफारी घडवली जाणार असल्याने त्यांच्यात अभूतपूर्व उत्साह दिसून आला. व्याघ्र दूतांचा उत्साह वाढवण्यासाठी वन्यजीव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ हा संदेश देत पथनाट्य सादर करत ही रॅली जळगाव, नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूर मार्गे पाल असा दोन दिवसांचा जनजागृती प्रवास करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे आणि अध्यक्ष रवींद्र फालक यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले. उपाध्यक्ष मुकेश सोनार आणि सतीश कांबळे यांनी संस्थेची भूमिका विषद केली, तर यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी सहभागी व्याघ्र दूतांचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले.
२९ जुलै रोजी पाल येथे यावल उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या हस्ते जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना जंगल सफारी, टी-शर्ट वाटप, दुर्गम भागातील आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच वनमजुरांना चटई वाटप करण्यात येणार असून, वृक्षारोपण, बिजारोपण कार्यक्रम आणि जनजागृती कार्यक्रम होईल, अशी माहिती सचिव योगेश गालफाडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, यावल वनविभाग जळगावचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील तसेच वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, उपाध्यक्ष सतीश कांबळे, मुकेश सोनार आणि इतर अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत. या जनजागृती कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील आणि राज्यांतील संस्था व व्याघ्र दूत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, जंगलाच्या धर्तीवर सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ सर्वांचे आकर्षण ठरले आहेत.



