सराफा व्यापाऱ्यांचे १७ लाखांचे सोने लांबविणाऱ्या सुवर्ण कारागीराला अटक; शनीपेठ पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सराफ बाजारातील दोन साराफा व्यापाऱ्यांचे तब्बल १७ लाख रुपयांचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली सुवर्ण कारागिराला शनिपेठ पोलिसांनी तुमसर रेल्वेस्थानक येथून रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अटक केली आहे. त्याच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगाली कारागिर शेख अमीरुल हुसेन (वय-२८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु. जोशी पेठ, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (वय-३०, रा. लक्ष्मी नगर) यांनी कारागिर शेख अमीरुल हुसेन याला १५ लाख रुपये किंमतीचे २२५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दिली होती. या सोन्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (रा. जळगाव) यांची दोन लाख रुपये किंमतीची ३१ ग्रॅम वजनाची चैन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन कारागिर शेख अमीरुल हुसेन हा पसार झाला होता. मुंबई-हावडा मेलने पश्चिम बंगाल येथे जात असताना तुमसर रोड स्थानकावर आरपीएफच्या पथकासह शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि चंद्रकांत धनके, पोकॉ रवी तायडे यांनी त्याला ताब्यात घेतले.

शेख याला जळगावात आणून त्याची शनिपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, सराफ व्यावसायिकांनी सोने दिल्यानंतर त्याचे दागिने घडवून परत देत असताना त्यात थोडी-थोडी घट येत होती. मात्र सराफ व्यावसायिकांना पूर्ण सोने द्यावे लागते, त्यामुळे दुसऱ्या सराफ व्यावसायिकाकडून दागिने घडवण्यासाठी घेतलेले सोने पहिल्या व्यावसायिकाला देत होता. दुसऱ्या सराफ व्यावसायिकाची भर काढण्यासाठी तिसऱ्याचे सोने त्याला द्यावे लागत असे. असे करता-करता कर्जाचे ओझे वाढत गेले. त्यामुळे आता ज्यांना-ज्यांना सोने द्यायचे आहे, त्यांना ते देण्यासाठी हाती आलेल्या २५६ ग्रॅम सोन्यातून हिशोब चुकता करण्याचे शेख याने ठरवले. त्यानुसार त्याने १५८.१२ ग्रॅम सोने वेगवेगळ्या जणांना देऊन उर्वरित ९७.८८० ग्रॅम सोने घेऊन तो गावाकडे निघाला होता. गावी जाऊन उर्वरित सोने विकून संबंधित सराफाला पैसे पाठवू आणि उर्वरित रकमेसाठी वेळ मागून घेऊन, असे त्याने ठरवले. मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
शेख हा जळगावात आठ वर्षांपासून सुवर्ण कारागिर म्हणून काम करत आहे. हे काम करता-करता तो पत्ते, जुगारही खेळू लागला व त्या नादातून त्याच्यावर कर्ज वाढत गेल्याचे काही सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र तपासात तसे समोर आलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Protected Content