
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगतच्या सावखेडा शिवारातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘पारंपरिक दिवस’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धता विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून अचूकपणे सादर केली, ज्यामुळे संपूर्ण शाळा एक रंगीत आणि सांस्कृतिक उत्सवाचे केंद्र बनली होती.

या दिवशी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, मणिपूर, गोवा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या विविध राज्यांतील पारंपारिक पोशाख परिधान केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने त्या-त्या राज्याच्या संस्कृतीची झलक वेशभूषा, नृत्य, हावभाव आणि चालण्यातून प्रभावीपणे प्रकट केली. मुलींनी नऊवारी साडी, बंगाली टांट साडी, केरळी कसावू साडी आणि मणिपुरी पोशाख परिधान केले होते, तर मुलांनी धोतर-कुर्ता, पगडी, राजस्थानी अंगरखा आणि तामिळ पंचा व अंगवस्त्र यांसारखे पारंपरिक पोशाख घालून संस्कृतीचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर विविध राज्यांतील लोकनृत्य, गीते आणि फॅशन शो सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “पारंपरिक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील विविधतेतील एकता अनुभवली. ही शिकवण त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी पहेल गादिया आणि विहान मुथा यांनी समर्थपणे केले, ज्यामुळे कार्यक्रमाला रंजक स्वरूप आले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या देशभक्तिपर गीताने करण्यात आली. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.



