सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सातारा शहरात सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आली. या टोळीला एकाच्या हत्येसाठी २० लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना डायल ११२ वर माहिती मिळाली की, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. बीट मार्शल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. अधिक फौजफाटा मागवण्यात आला आणि एलसीबी व शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांना पकडले, परंतु एकजण पळून गेला.
पोलिसांनी अनुज चिंतामणी पाटील, दीप भास्कर मालुसरे, क्षितीज विजय खंडाईत, आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी आणि अक्षय अशोक कुंडूगळे या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत दोन देशी बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या आणि २ लोखंडी सुरे सापडले. त्यांनी साताऱ्यातील सराफी दुकानावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली.
या टोळीला सुपारी देणारा नीलेश लेवे आणि मध्यस्थ विशाल सावंत यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश लेवेने धीरज ढाणेच्या हत्येसाठी २० लाखांची सुपारी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी नीलेश लेवे आणि पप्पू लेवे यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणात नीलेशचे वडील उदयराजे समर्थ वसंत लेवे यांना धीरज ढाणे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. या रागातून नीलेशने धीरजला मारण्यासाठी सुपारी दिली होती.