Home Cities जळगाव संगीताच्या सुवर्णकाळाची मोहक झलक : ओमेश चौधरी यांच्या ग्रामोफोन आणि तबकड्यांचे दुर्मिळ...

संगीताच्या सुवर्णकाळाची मोहक झलक : ओमेश चौधरी यांच्या ग्रामोफोन आणि तबकड्यांचे दुर्मिळ प्रदर्शन 

0
168

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जुन्या काळातील सुमधुर संगीत, ग्रामोफोनचा आवाज, आणि तबकड्यांवरील अजरामर गीतांची आठवण जागवणारे एक आगळंवेगळं प्रदर्शन सध्या जळगाव शहरातील पु. ना. गाडगीळ कलादालनात सुरु आहे. ओमेश चौधरी यांच्या अथक परिश्रमातून उभं राहिलेलं हे प्रदर्शन रसिकांसाठी एक दुर्मीळ संधी ठरत आहे. आज व उद्या हे प्रदर्शन पाहण्याची शेवटची संधी असून, संगीतप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन खुद्द चौधरी यांनी केलं आहे.

या प्रदर्शनात ओमेश चौधरी यांनी सादर केलेल्या तबकड्यांचा संग्रह तब्बल साडेतीन हजारांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, ही सर्व तबकडी आजही सुस्थितीत आहेत आणि ग्रामोफोनवर ऐकण्यासाठी योग्य आहेत. जुन्या हिंदी चित्रपटांच्या गाजलेल्या गीतांपासून ते दुर्मिळ मराठी गाण्यांपर्यंतचा हा खजिना रसिकांच्या श्रवणभक्तीची खरी मेजवानी ठरत आहे. ग्रामोफोनवर फिरणाऱ्या सुईचा आवाज आणि त्यावर वाजणाऱ्या गाण्यांचा अनुभव ही आजच्या डिजिटल युगात हरवलेली संगीतिक अनुभूती पुन्हा जिवंत करत आहे.

या प्रदर्शनाला नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. त्यांनी चौधरी यांच्या संग्रहाचे कौतुक करत त्यांच्या जिद्द, आवड आणि संग्रहाबद्दल भरभरून प्रशंसा केली. विविध काळातील तबकड्यांमध्ये असलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.

ओमेश चौधरी हे गेली अनेक वर्षं जुन्या तबकड्यांचा संग्रह करत असून, त्यांनी हा खजिना केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता रसिकांसाठी खुला केला आहे, ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. हे प्रदर्शन म्हणजे केवळ संगीतप्रेमींसाठीच नव्हे, तर नव्या पिढीसाठी देखील एक ऐतिहासिक शिक्षणाचा अनुभव ठरतो.


Protected Content

Play sound