वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहर्डी शिवारामध्ये आज दुपारी शेतात काम करत असताना खाली लोंबकळत्या वीजवाहिनीला धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बोहर्डी येथील संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर रामचंद्र सावळे (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोहर्डी शिवारातील शेतकरी भास्कर साळवे हे शेतामध्ये काम करत होते. त्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत वाहक तारा या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होत्या. व त्या खाली लोंबकळत होत्या. याच स्तरावरून दुसऱ्या एलटी विद्युत वाहक तारा ही गेल्या होत्या. त्या तारांच्या संपर्कात खालील लोंबकळणाऱ्या तारा आल्यामुळे यातही विद्युत प्रवाह वाहत होता. परंतु भास्कर साळवे त्यांच्या लक्षात न आल्याने या विद्युत तारांचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बोहर्डी येथील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर रस्ता रोको केला यामुळे काही वेळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तातडीने वाहतूक सुरळीत केली आहे. सध्या वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्याचे काम सुरू आहे.