जळगाव प्रतिनिधी । दुकान सुरू ठेवण्यासाठी दरमहा खंडणी न देणाऱ्या तालुक्यातील मन्यारखेडा येथील व्यापाऱ्याला तिक्ष्ण हत्यार, लोखंडी आसारी व लाकडी दांड्याने जीवे ठार मारण्याचा प्रकार रविवारी रात्री ८.३० वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, परशूराम शंकर आव्हाड (वय-२९) रा. कालिका माता मंदीर यांचे मन्यारखेडा ता. जि.जळगाव शिवारात श्रीराम ट्रेडर्स नावाचे कंपनी आहे. कंपनी चालवून आव्हाड आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. रविवारी ६ जुन रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सरला पाटील, सौरभ गांवडे, रोशन गांवडे, योगेश अनिल जाधव, अकाश अनिल जाधाव , शुभम अनिल जाधव, मुकेश अनिल जाधव, तेजस मधुकर बोरसे आणि सचिन बंजारी (सर्वांचे पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांनी कंपनीचे मालक परशूराम आव्हाड यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून दरमहा खंडणी व हप्ता द्यावा लागेल असे सांगितले. त्यावर व्यापारी आव्हाड यांना हप्ता देण्यास नकार दिल्याने सर्वांनी धारदार तिक्ष्ण हत्यार, लोखंडी आसारी व लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याचा हल्ला केला. याप्रकरणी आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहे.